Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसावर तरुणीने केले चाकूने सपासप वार

पोलिसावर तरुणीने केले चाकूने सपासप वार

छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा 

मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर विनाकारण फिरून गोंधळ घालणाऱ्या तरुण-तरुणींना हटकत घरी जाण्यास सांगणे एका पोलिस अंमलदाराच्या अंगाशी आले आहे. तरुणांनी पोलिसाला घट्ट पकडून ठेवत याला जिवंत सोडू नको अशी चिथावणी दिली आणि त्यानंतर एका तरुणीने पोलिसाच्या पाठीवर व बरगडीवर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि.८) मध्यरात्री सव्वाएकाच्या सुमारास करोडी परिसरातील आंबेडकर चौकात घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांनी तीन महिलांसह ८ जणांवर गुन्हा दाखल केला असून, चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

फकीरा नब्बास तडवी (३७, रा. पोलिस कॉलनी, मिल कॉर्नर) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंमलदाराचे नाव असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शाहरुख ऊर्फ जावेद, रोहिणी सुभाष बेळगे, अश्विनी सुभाष बेळगे, सागर संजय इंगळे, अभि गायकवाड, रोहित चव्हाण (सर्व रा. कमळापूर, रांजणगाव) आणि इतर दोन अनोळखी व्यक्तींवर दौलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौलताबाद ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार फकीरा तडवी हे ७ ऑक्टोबरच्या रात्री अंमलदार गाडे आणि होमगार्ड नईम यांच्यासोबत डायल ११२ च्या शासकीय वाहनावर रात्रगस्तीवर होते. मध्यरात्री १२:२२ वाजेच्या सुमारास भांगसीमाता गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोकळ्या पटांगणात तीन महिला व पाच पुरुष संशयास्पदरीत्या बसलेले आढळले.

पोलिसांनी त्यांना रात्रीच्या वेळी येथे थांबण्याचे कारण विचारले व सुरक्षेच्या कारणास्तव तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यानंतर रात्री १:१० वाजेच्या सुमारास करोडी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील आंबेडकर चौकात चोर आल्याची माहिती एका प्रवाशाने गस्ती पथकाला दिली. तडवी आणि त्यांचे सहकारी तत्काळ तेथे पोहोचले असता, आधी हटकलेले तेच आठ जण तिथे आपापसांत पुन्हा गोंधळ घालत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना हटकत त्यांची नावे विचारली आणि घरी जाण्यास सांगितले.

हटकल्याचा राग आल्याने या टोळक्याने पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली. अचानक शाहरुख आणि अभि गायकवाड या दोघांनी तडवी यांना पाठीमागून घट्ट पकडून ठेवले आणि अश्विनी, तुझ्या जवळच्या चाकूने या पोलिसाला भोसकून टाक, हा जिवंत नाही राहिला पाहिजे, अशी चिथावणी दिली. लागलीच अश्विनीने धारदार चाकू काढून तडवी यांच्या पाठीवर ५, डाव्या बरगडीवर तसेच दोन्ही हातांवर सपासप वार केले. यावेळी रोहिणी, सागर व इतर अनोळखी तिघांनी पोलिस अंमलदार गाडे आणि होमगार्ड नईम यांनाही बेदम मारहाण केली.

तडवी गंभीर जखमी झाल्याचे पाहून सोबतच्या पोलिसांनी तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अतिरिक्त कुमक बोलावली. पोलिसांचे पिटर वाहन घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी दोन दुचाकी आणि एका कारमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी झटापट करून सागर इंगळे याला जागेवरच पकडले. पोलिसांनी आतापर्यंत एका तरुणीसह चार आरोपींना अटक केली आहे. इतर पसार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.