'त्या' एका गोष्टीवरून न्यायालय संतापलं; अंबानींच्या जबाबावर NIA ला थेट सवाल, वाझेला जामीन
मुंबई : खरा पंचनामा
अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला जामीन मंजूर करताना मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
उद्योगपती मुकेश अंबानी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा अद्याप जबाब का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने केला. "घटनेला पाच ते सहा वर्षे उलटून गेल्यानंतरही तपास यंत्रणा नेमक्या कोणत्या शुभ मुहूर्ताची वाट पाहत आहे?", अशा शब्दांत न्यायालयाने एनआयएच्या तपासातील विलंबावर नाराजी व्यक्त केली.
विशेष सत्र न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांच्या न्यायालयाने सचिन वाझेला जामीन मंजूर केला. जामीन देताना न्यायालयाने एनआयएने लावलेल्या कठोर यूएपीए कलमांसह तपासातील विविध बाबींवर निरीक्षणे नोंदवली.
अँटिलियाच्या बाहेर स्फोटके ठेवण्यात आल्याचा आरोप असतानाही अंबानी कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मनात भीती निर्माण झाली होती, हे सिद्ध करणारा ठोस पुरावा किंवा साक्षीदाराची साक्ष रेकॉर्डवर नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
विशेष म्हणजे एनआयएचे कार्यालय आणि अँटिलिया हे जवळच असून दोन्ही ठिकाणांची संरक्षक भिंतही सामायिक असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. असे असतानाही इतक्या वर्षांच्या तपासात मुकेश अंबानी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक यांचा सीआरपीसीच्या कलम 161 किंवा 164 अंतर्गत जबाब नोंदवण्यात आलेला नाही.
न्यायालयाने एनआयएच्या विशेष सरकारी वकिलांना याबाबत प्रश्न विचारला असता, तपास सुरू असून पुरवणी आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर न्यायालयाने तपासातील विलंबावर नाराजी व्यक्त केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.