Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सहकारी साखर कारखान्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! 13 सदस्यीय समिती स्थापन; साखर उद्योगात काय बदल होणार?

सहकारी साखर कारखान्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! 13 सदस्यीय समिती स्थापन; साखर उद्योगात काय बदल होणार? 



पुणे : खरा पंचनामा 

राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. साखर कारखानदारी टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यांची विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीला आपला सविस्तर अभ्यास अहवाल आणि शिफारशी सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 

सहकार विभाग आणि राज्य सहकारी बँक संयुक्तपणे राज्यातील कारखान्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. कारखाने बंद पडण्यामागील नेमकी कारणे आणि आर्थिक अडचणींचा शोध या समितीमार्फत घेतला जाईल. या समितीमध्ये सहकार आयुक्त, रिझर्व्ह बँक, नाबार्ड, राज्य सहकारी बँक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या तज्ज्ञ प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे. अडचणीतील कारखान्यांना बाहेर काढण्यासाठी प्रत्येक कारखान्याची स्वतंत्र आर्थिक क्षमता तपासली जाणार आहे. 

यामध्ये खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम केले जाईलः कर्ज आणि गुंतवणूक धोरणः एनपीए श्रेणीतील कारखान्यांच्या कर्ज निवारणासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने विशेष आराखडा तयार होईल. तसेच, हंगामानुसार स्वतंत्र कॅश क्रेडिट खाते, कर्ज परतफेडीचे धोरण, बाह्य गुंतवणूकदारांचा सहभाग आणि एनसीडीसीमार्फत भांडवली मदत मिळवण्याबाबत धोरण ठरवले जाईल. 

ऊर्जा संकुल आणि अतिरिक्त उत्पन्नः कारखान्यांना केवळ साखर निर्मितीवर अवलंबून न ठेवता त्यांचे 'ऊर्जा संकुलात' रूपांतर केले जाईल. इथेनॉल, सीबीजी (CBG), हरित हायड्रोजन, सौर ऊर्जा, सहवीज निर्मिती आणि शाश्वत विमान इंधन निर्मितीला चालना दिली जाईल. 10 विविध उपपदार्थांच्या निर्मितीसाठी 'झिरो वेस्ट' बायो-रिफायनरी मॉडेल विकसित केले जाणार असून, यासाठी केंद्राचा 20 टक्के, राज्याचा 10 टक्के आणि कारखान्यांचा 70 टक्के निधी वापरण्याच्या प्रस्तावाची तपासणी होईल. 

आधुनिक शेती तंत्रज्ञान: ऊस उत्पादन आणि साखर उतारा वाढवण्यासाठी एआय, ड्रोन, जीपीएस आणि ठिबक सिंचनाचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल. यासोबतच दर्जेदार बियाणे, मातीचे आरोग्य आणि पीक फेरपालट यांसारख्या विषयांचाही सखोल अभ्यास ही समिती करणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.