नाशिक : खरा पंचनामा
मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात भोंदूगिरीच्या अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी अशोक खरात नावाच्या भोंदूने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केल्याची घटना ताजी असतानाच, आता नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमधून आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.
इथं एका भोंदूबाबाने प्रेमविवाह केलेल्या तरुणीला भीती दाखवून तिचा संसार आणि लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आहे. या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्रमक होत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील एका २२ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने स्वतःच्या पसंतीने ३१ ऑक्टोबर रोजी प्रेमविवाह केला होता. मात्र, हा विवाह मान्य नसलेल्या तिच्या माहेरच्या नातेवाईकांना हा प्रकार कोणत्याही हालतीत मोडायचा होता. यासाठी त्यांनी ४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास या तरुणीला सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील एका भोंदूबाबाच्या दरबारात बळच नेले.
पंचाळे येथील त्या भोंदूबाबाने तरुणीला आपल्या जाळ्यात घेत अंधश्रद्धेच्या आधारे प्रचंड भीती निर्माण केली. त्याने तरुणीला धमकावत सांगितले की, "जर तू या विवाहात आणि पतीसोबत राहिलीस, तर तुझा पती पुढील दोन महिन्यांत नक्की मरेल." या भीतीपोटी तिच्या मनात घात घालण्यासाठी आणि संसारात फूट पाडण्यासाठी भोंदूबाबाने तिला लिंबू आणि दोरा बांधल्याचेही समोर आले आहे.
उच्चशिक्षित तरुणीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अशा प्रकारे भोंदूबाबाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवून व भीती घालून तरुण-तरुणींचे संसार मोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकांची दिशाभूल करणाऱ्या आणि समाजाला अंधकारात ढकलणाऱ्या या भोंदूबाबावर तात्काळ 'जादूटोणा विरोधी कायद्यान्वये' गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी अंनिसच्या वतीने करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
