सुनेत्रा पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चावर एका वाक्यात उत्तर; म्हणाल्या, 'जशी वेळ येईल...'
पुणे : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात वेग आला आहे. अशातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत या चर्चावर मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
विलिनीकरणाबाबत विचारले असता, 'जशी वेळ येईल, तशा गोष्टी आपल्याला कळतील,' असे एका वाक्यात उत्तर देत त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी या विषयावर सध्या तरी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, याबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
या सर्व घडामोडींदरम्यान शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील 20 ते 22 आमदार लवकरच पक्ष सोडू शकतात, असे राऊत म्हणाले.
'सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील 20 ते 22 आमदार कधीही बाहेर पडू शकतात. हे आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहेत. शरद पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ही भेट केवळ गप्पा मारण्यासाठी नाही,' असे संजय राऊत यांनी म्हटले.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाचा मुद्दाही उपस्थित केला. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्वाची परिस्थिती बदलली आहे. पक्षातील आमदारांना सध्या स्वाभिमान गहाण ठेवून काम करावे लागत असल्याचे राऊत म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
