अन् बॉयफ्रेंडनं प्रेयसीचं घर पेटवलं ! ब्रेकअप केल्यानं डोकं सटकलं अन् आई-वडील घरात असतांनाच घराला आग लावत..
डोंबिवली : खरा पंचनामा
प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतल्याने संतापलेल्या तरुणाने प्रेयसीच्या घरालाच आग लावल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. या घटनेवेळी तरुणीसह तिचे आई-वडील घरात उपस्थित होते.
सुदैवाने तिघेही या घटनेतून बचावले आहेत. दीपेश रस्तोगी असे आरोपीचे नाव असून, मानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
डोंबिवलीतील एका वस्तीत राहणाऱ्या तरुणीचे दीपेश रस्तोगी याच्यासोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरुवातीला त्यांचे नाते सुरळीत सुरू होते. मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद आणि वाद होऊ लागले. सततच्या वादांना कंटाळून तरुणीने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. तिने दीपेशला ब्रेकअपबाबत स्पष्टपणे सांगितले.
मात्र, प्रेयसीचा हा निर्णय दीपेशला मान्य झाला नाही. त्यातून संतापलेल्या दीपेशने थेट प्रेयसीचे घर गाठले आणि घराला आग लावल्याचा आरोप आहे.
घटनेच्या वेळी तरुणी आणि तिचे आई-वडील घरातच होते. अचानक आग लागल्याने घरातील तिघांचीही धावपळ उडाली. आगीमुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र, सुदैवाने तिघांनीही स्वतःचा बचाव केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी दीपेश रस्तोगी याला अटक केली आहे. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आग लावली, यामागे आणखी काही उद्देश होता का आणि या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.