ऐन दिवाळीत मिरज शहर खुनाच्या घटनेने हादरले
किरकोळ वादातून ५० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने निर्घृण खून
मिरज : खरा पंचनामा
मिरज शहरातील कुंभार गल्ली शेजारी शेतकरी चौक परिसरात भरदुपारी खुनाची धक्कादायक घटना उघडकीस आली शेतकरी चौकातुन डोंणगे गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ५० वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
इलाही लालसाब शेख (वय ५०, रा. डोंगे गल्ली, मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या ऐन दिवाळीत खुनाच्या घटनेमुळे मिरज शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इलाही शेख हे आपल्या मोटारसायकलवरून शेतकरी चौकाकडून डोंणगे गल्लीच्या दिशेने जात होते. यावेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्लेखोराने त्यांच्या मानेवर आणि डोक्यात जोरदार वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दरम्यान, हा खून शेजारी असणाऱ्या घरगुती वादातून झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा सुरू केला असून, हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
भरवस्तीत घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे डोंणगे गल्ली आणि शेतकरी चौक परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे मात्र किरकोळ शेजारील वादातून ऐन सणासुदीच्या दिवसांत खून झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
