सांगलीवाडीत हॉटेलमधील वादातून एकाचा खून;
सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : एक संशयित पोलीस?
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली ते आष्टा रोडवरील हॉटेल अनुयश येथे जेवण करण्यासाठी गेलेल्या ३६ वर्षीय विजय वसंत पाटील यांचा हॉटेलमधील वादानंतर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विजय पाटील हे शेती करत होते आणि दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११:४५ वाजता ते आपले मित्र विशाल काटकर यांच्यासह हॉटेल अनुयश येथे जेवण करण्यासाठी गेले होते, जिथे हॉटेल मालक हरीदास पाटील यांच्याशी त्यांचा वाद झाला होता.
दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १२:२५ वाजता विजय यांचे बंधू विशाल वसंत पाटील हे आपले मित्र प्रकाश भानुसे व पवन कोळी यांच्यासह त्याच हॉटेलमध्ये गेले असता, तिथे विजय आणि हॉटेल मालक हरीदास पाटील यांच्यात वाद सुरू असल्याचे व हरीदास पाटील शिवीगाळ करत असल्याचे त्यांना दिसून आले. तो वाद सोडवण्यासाठी गेले असताना राम सरगर, लखन सरगर आणि एका अन्य अनोळखी व्यक्तीने विजय पाटील यांना पकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि त्यांना भिंतीवर व लोखंडी शटरवर आपटल्यामुळे ते बेशुद्ध होऊन खाली पडले. यादरम्यान आरोपींपैकी एकाने आपण नवी मुंबई पोलीस दलात नोकरीस असल्याचे सांगून आपले ओळखपत्र दाखवले.
घटना घडल्यानंतर मित्रांनी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे विजय पाटील यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी विशाल वसंत पाटील यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात राम सरगर, लखन सरगर आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.