Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

७ वर्षे ८ महिन्यांपासून फरार असलेला कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यातील आरोपी जेरबंदसांगली पोलिसांची मोठी कारवाई

७ वर्षे ८ महिन्यांपासून फरार असलेला कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्यातील आरोपी जेरबंद
सांगली पोलिसांची मोठी कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने तब्बल सात वर्षे आणि आठ महिन्यांपासून फरार असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. तासगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात प्रतीक दीपक कांबळे (वय ३४, रा. शिरगाव रोड, नागठाणे, ता. पलुस, जि. सांगली) असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी गुन्हा घडल्यापासून गेल्या ७ वर्षे ८ महिन्यांपासून फरारी होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींनीआपसात संगनमत करून स्वराज्य अ‍ॅग्रो कंपनी स्थापन केली होती. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी फिर्यादी शिवाजी भानुदास चव्हाण आणि इतर ६५ गुंतवणूकदार शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचे खोटे आश्वासन दिले होते. या आमिषापोटी फिर्यादी आणि इतर शेतकऱ्यांकडून स्वराज्य अ‍ॅग्रो कंपनीत गुंतवणूक करून घेण्यात आली. मात्र, कडकनाथ कोंबडीचे युनिट देताना करारातील अटींचे पालन न करता आणि गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता एकूण ५६ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात भादवि संकलम ४२०, ४०६, ३४ आणि एमपीआयडी कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेला या फरार आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकातील अधिकारी व अंमलदारांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी प्रतीक कांबळे हा त्याच्या नागठाणे येथील घरी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगोला मेटफळे, आटपाडी, विटा, कुंडल आणि वाळवा मार्गे जाऊन त्याच्या राहत्या घरी छापा टाकला. गोपनिय माहिती आणि योग्य सापळा रचून पोलिसांनी आरोपी प्रतीक दीपक कांबळे यास दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे २:२० वाजता जागेवरच ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करीत आहेत.

भांडवलकर यांच्यासह रमेश कोळी, संदीप मोरे, विशाल भिसे, रिचर्ड स्वामी, पोना/सचिन मोरे, सायबर पोलीस ठाण्याच्या सपोनि रुपाली बोबडे, कॅप्टन गुंडवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.