Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांचा डंका; या तीन नेत्यांनी मिळवला विजय

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांचा डंका; या तीन नेत्यांनी मिळवला विजय 



दिल्ली : खरा पंचनामा 

अमेरिकेतील २०२६ च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवारांनी महत्त्वपूर्ण यश मिळवत अमेरिकेच्या राजकारणात आपला प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. 

डेमोक्रॅटिक पक्षाचे सुहास सुब्रमण्यम, अरुणा मिलर आणि पिया दांडिया यांनी आपापल्या निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. तर रिपब्लिकन पक्षाचे भारतीय वंशाचे नेते विवेक रामास्वामी यांना ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून, विविध वृत्तसंस्थांनी जाहीर केलेल्या निकालांच्या अंदाजानुसार हे चित्र स्पष्ट झाले आहे. 

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील भारतीय वंशाचे प्रतिनिधित्व वाढवण्याच्या दृष्टीने पिया दांडिया यांचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे. व्हर्जिनियाच्या दहाव्या काँग्रेस मतदारसंघातून डेमोक्रॅटिक पक्षाचे सुहास सुब्रमण्यम यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांनी रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डेव्ह बेकविथ यांचा पराभव केला. उपलब्ध निकालांनुसार सुब्रमण्यम यांना ६३.१६ टक्के मते मिळाली, तर बेकविथ यांना ३४.६६ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. स्वतंत्र उमेदवार अहसेन मुजीब मलिक यांना १.९९ टक्के मते मिळाली. २०२४ मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवडून आलेल्या सुब्रमण्यम यांना आता दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. 

मेरीलँडच्या उपराज्यपालपदावर भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर वेस मूर आणि उपराज्यपालपदाच्या उमेदवार अरुणा मिलर या जोडीने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॅन कॉक्स यांचा पराभव केला. असोसिएटेड प्रेसने या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मेरीलँडच्या वरिष्ठ कार्यकारी नेतृत्वात अरुणा मिलर यांचे स्थान कायम राहणार आहे. फ्लोरिडाच्या २२ व्या काँग्रेस मतदारसंघातील निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या पिया दांडिया यांनी रिपब्लिकन उमेदवार केसी अस्कर यांचा पराभव केला. सीबीएस न्यूजने त्यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. 

भारतीय स्थलांतरित कुटुंबात जन्मलेल्या दांडिया यांनी शिक्षण, महागाई आणि आर्थिक संधी हे मुद्दे प्रचारात मांडले होते. त्यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक नेत्यांचे प्रतिनिधित्व अधिक मजबूत होणार आहे. दरम्यान, ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे विवेक रामास्वामी यांना पराभव पत्करावा लागला. डेमोक्रॅटिक पक्षाच्या एमी अॅक्टन यांनी त्यांच्यावर मात केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.