गोंदिया : खरा पंचनामा
गोंदिया जिल्ह्यातील गंगाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दांडेगाव बसस्थानकाजवळ गोंदिया-तिरोडा राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात घडला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संतप्त गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या हलगर्जीपणाचा तीव्र संताप व्यक्त केला. मृतांमध्ये रितेश बावनकर (वय १७, रा. खळबंदा गोंदिया तालुका), शिवप्रसाद कांबळे (वय १७, रा. खळबंदा गोंदिया तालुका), कार्तिक बिसेन (वय 20, रा. सेजगाव तिरोडा तालुका) यांचा समावेश आहे.
दुचाकीवरून तीन तरुण प्रवास करीत असताना गंगाझरी पोलीस ठाण्याच्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात पोलीस वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती दांडेगाव आणि परिसरातील गावांमध्ये पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
पोलिसांच्या वाहनामुळे तीन तरुणांचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर टायर पेटवून पोलिस प्रशासनाचा निषेध केला. तसेच संबंधित पोलीस वाहन चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
