छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
शुक्रवारी रात्री उशिरा महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली होती. तीन तरुणांनी काचेची बाटली आणि दगडाने घरावर हल्ला केला होता. एका मंत्र्याच्या घरावर अशाप्रकारे हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणी विविध तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून हल्लेखोरांची कुंडली समोर आली आहे.
शिरसाट यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सातारा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अवघ्या काही मिनिटांत अटक केली होती. हे तिन्ही तरुण शिरसाट यांच्या निवासस्थान परिसरात आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आलं होतं. या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता महत्त्वाची माहिती समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करण्याचा आरोप झालेले तिन्ही तरुण उच्चशिक्षित असून त्यातील एक तरुण विदेशात नोकरी करतो.
दिवाळीनिमित्त तिघे मित्र एकत्र भेटले होते. त्यांनी शहरातील एन-१ आणि त्यानंतर उल्कानगरीत मद्यपार्टी केली होती. पण रात्री उशिरा मद्याची दुकानं बंद झाल्यानंतर तिन्ही तरुण आणखी दारू मिळेल, या अपेक्षेने गोलवाडी फाट्यावरील बारकडे गेले. याच परिसरात शिरसाट यांचं निवासस्थान आहे.
येथील बारमधून बाहेर पडल्यानंतर सर्व्हिस रोडवर त्यांची दुचाकी घसरली. त्यानंतर त्यांनी परिसरात दोन-तीन वेळा चकरा मारल्या.
त्यांच्या हालचाली पाहून शिरसाट यांच्या सुरक्षारक्षकांनी चौकशी केली आणि त्यातून वाद वाढला, असे तिघांनी पोलीस चौकशीत माहिती दिल्याचं कळत आहे. त्यामुळे ही घटना प्रासंगिक वादातून घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र पोलिसांकडून तरुणांच्या दाव्याची सखोल चौकशी सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
