हातचलाखीने महिलेची फसवणूक करून सोने लांबवणारा चोरटा जेरबंद
५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत हातचलाखीने महिलेची फसवणूक करून सोन्याची मोहनमाळ लांबवणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ५ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तुषार मनोज वाघीरे (वय ३१, रा. शिवाजीनगर, महात्मा गांधी वसाहत, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, या प्रकरणातील त्याचे साथीदार शब्बीर मिस्कीन इराणी आणि जाफर बेग (दोघे रा. परळी, जि. बीड) हे पसार आहेत.
दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी शेटफळे (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील फिर्यादी शारदा बबन गायकवाड या घरी जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले.
परिसरात चोर आले असून तुम्ही एवढे सोने घालून फिरू नका, तुमच्या गळ्यातील सोने काढून द्या, मी ते तुमच्या पिशवीत सुरक्षित ठेवतो, असे सांगून संशयितांनी त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने गळ्यातील ४३.८०० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ काढून दिली असता, ती पिशवीत न ठेवता आरोपींनी हातचलाखीने स्वतःकडे ठेवून त्यांची फसवणूक केली.
याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाने तपास सुरू केला.
दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी कॉलेज कॉर्नर परिसरातील जी. ए. कॉलेज गेटसमोर येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून तुषार वाघीरे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पँटच्या उजव्या खिशात ४३.८०० ग्रॅम वजनाची, अंदाजे ५ लाख १० हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ आढळून आली.
सखोल चौकशीत आरोपीने आपल्या दोन साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. हे सोने साथीदारांनी आपल्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे त्याने सांगितले. जप्त केलेली मोहनमाळ आणि आरोपी पुढील तपासासाठी आटपाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत. ही कामगिरी एलसीबी व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, सागर लवटे, आनिल कोळेकर, नागेश खरात, अमर नरळे, सतिश माने, सागर टिंगरे, संदीप नलावडे, संदीप गुरव, अमिर फकीर, उदय माळी, मच्छिद्रं बर्डे, सुनील जाधव, विक्रम खोत, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.