नाशिक : खरा पंचनामा
नाशिकमधील सिटी सेंटर मॉल परिसरातील उषा किरण सोसायटीमध्ये निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) हेमंत गोविंद हेमाडे यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कौटुंबिक आणि मालमत्तेच्या वादातून गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ सुरू होता, असा गंभीर आरोप त्यांच्या दुसऱ्या पत्नी योगिता यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी हेमाडे यांच्या मुलासह मुलगी, सून आणि व्याह्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हेमंत हेमाडे हे राज्य परिवहन विभागात RTO अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवाकाळात त्यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये काम केले होते. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी परवानाधारक पिस्तुलासाठी अर्ज केला होता. शासनाने त्यांना पिस्तूल बाळगण्याची परवानगीही दिली होती. डिसेंबर २०२५ मध्ये ते सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते नाशिकमधील गंगापूर रोड परिसरातील उषा किरण सोसायटीमधील स्वतःच्या बंगल्यात दुसरी पत्नी योगिता यांच्यासोबत राहत होते.
हेमाडे यांच्या पहिल्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना यश नावाचा मुलगा आणि प्रियंका नावाची मुलगी आहे. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सुमारे १५ वर्षांपूर्वी त्यांनी योगिता यांच्याशी दुसरा विवाह केला. मात्र, हा विवाह पहिल्या पत्नीच्या मुलांना मान्य नव्हता. त्यानंतर कुटुंबात वाद सुरू झाल्याचा आरोप आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, हेमाडे यांच्या नाशिकमधील बंगल्यासह अन्य स्थावर मालमत्तेवरून कुटुंबात वाद सुरू होता. मुलगा यश आणि मुलगी प्रियंका यांनी दुसरी पत्नी योगिता यांना मालमत्तेतील हक्क सोडण्यास सांगण्यासाठी वडिलांवर दबाव आणल्याचा आरोप आहे.
८ ऑक्टोबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हेमाडे यांची फसवणूक करून त्यांच्या काही मिळकतीवर ताबा मिळवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या कथित प्रकाराविरोधात हेमाडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र, हा दावा आणि इतर प्रकरणे मागे घेण्यासाठी त्यांच्यावर वारंवार दबाव आणण्यात आल्याचा आरोप योगिता यांनी केला आहे. न्यायालयातील सुनावणीला हजर राहिल्यास पती-पत्नी दोघांसाठीही ती शेवटची तारीख ठरेल, अशी धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकारामुळे हेमाडे यांचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गुरुवारी रात्री उशिरा हेमाडे घरी परतले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्या खोलीतून मोठा आवाज आल्याने पत्नी आणि मुलीने तातडीने खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी हेमाडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर गंगापूर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटनास्थळावरून हेमाडे यांचे परवानाधारक पिस्तूल जप्त करण्यात आले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळली नव्हती. त्यानंतर पत्नी योगिता यांनी पोलिसांकडे सविस्तर तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१ (२), ३५१ (३) आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
