Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ख्रिस्ती समाजाचा सांगलीत विराट संविधान बचाव मोर्चा

ख्रिस्ती समाजाचा सांगलीत विराट संविधान बचाव मोर्चासांगली : खरा पंचनामा

महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाजावर होणारा अन्याय-अत्याचार, खोट्या केसेस व प्राणघातक हल्ल्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी ख्रिस्ती बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. मोर्चामध्ये हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशातील जाती-धर्मातील सहा हजार सातशे जातींना व ७० हजारहून जास्त पोटजातींना एक संविधानामध्ये समान हक्क आणि अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला राज्यघटनेत बहाल करुन दिले आहे. पण या महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती बांधव स्वतःला असुरक्षित मानत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये समता, बंधुता, स्वातंत्र्यबरोबर प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. जेणेकरुन या देशातील १३५ कोटी जनता सलोख्याने राहतील. आतापर्यंत सर्वजन सलोख्याने राहत असताना काही जातीय व धर्मांध लोकांनी त्याला काळिमा फासण्याचे काम केले आहे.

काही लोक जाणिवपूर्वक ख्रिस्ती धर्म हा इंग्रजांपासून आला आहे अशी खोटी व चुकीची अफवा पसरवत आहेत आणि ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे. भारत देशामध्ये ख्रिस्ती समाजाची शांतीमय समाज म्हणून ओळख आहे. ख्रिस्ती समाज पूर्वीपासून वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा, कुष्टरोगी सेवा, क्षयरोगी सेवा, अनाथ आश्रम व वृद्धाश्रम अशा अनेक सेवा करित आहेत. जे इतर लोक करु शकत नाही, त्यासुद्धा सेवा करणारा हा ख्रिस्ती समाज आहे.

या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती समाजाला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. छत्रपती शाहु महाराजांनी ज्या ख्रिस्ती बांधवांना सर्वोतोपरी मदत केली, त्यांच्याच धार्मिक भावना काही धर्मांध लोक दुखवत आहेत. ख्रिस्ती समाजाच्या पवित्र विधीची बदनामी केली जात आहे व ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. आजपर्यंत आम्ही शांतीच्या मार्गानेच जात आहोत, परंतु आता ख्रिस्ती बांधवांना विरोध फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. ज्या येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले तो वधस्तंभ आमच्यासाठी आस्था व श्रद्धा आहे, त्या वधस्तंभावर फूली (x) अशी खूण करणे व प्रभू भोजन विधीला चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर मांडणे व आमच्या प्रार्थनेला जादूटोणा म्हणणे अशा सर्वप्रकारे आमच्या भावना दुखवायचे काम काही मंडळीनी चालू केले आहे. ही मालिका थांबायचे नाव घेईना म्हणून समस्त ख्रिस्ती समाज आज रस्त्यावर उतरुन संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या अधिन राहून या सर्व प्रकारांचा निषेध म्हणून हा शांती मूक मोर्चा करत आहे.

ख्रिस्ती समाजावर धर्मांतर करण्याची कारणे दाखवून ख्रिस्ती धर्मगुरूंना नाहक त्रास दिला जात आहे व चर्चवर हल्ले करण्याची धमकी दिली जात आहे. परंतु या महाराष्ट्रामध्येच नाही तर अखंड भारतामध्ये अशी एकही तक्रार नाही की ख्रिस्ती लोकांनी कोणाचेही धर्मांतर केले आहे किंवा कोणावरही जबरदस्ती करुन, त्याला अमिष दाखवून धर्मांतरण केले आहे, असे कुठेही आढळले नाही. असे असताना ख्रिस्ती समाजाला जाणून-बुजून बदनाम केले जात आहे म्हणून हे सर्व चुकीचे प्रकार कुठे तरी थांबले जावे.

ख्रिस्ती समाजावर, चर्चवर, पाळक लोकांवर हल्ले, अन्याय व अत्याचार तात्काळ थांबवण्यात यावे. यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ज्या ज्या धर्मगुरूंवर व समाज्यातील लोकांच्यावर धर्मांतराच्या नांवावर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत, त्या तात्काळ मागे घेण्यात यावे. ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थना स्थळ व मेळावे असतील तिथे पोलिस संरक्षण देण्यात यावी. ज्या चर्चवर हल्ला करुन नासधूस झाली आहे, त्यांना सरकार ने तत्काळ नुकसान भरपाई देवून, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

नुकत्याच व्हाटस्अप, सोशल मिडियाच्या माध्यमातून ख्रिस्ती विधी, पवित्र प्रभूभोजन संदर्भात चुकीचा संभ्रम पसरविला जात आहे. पवित्र प्रभूभोजन विधीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीच्या पापांसाठी क्रुसावर बलिदान दिले, जेणेकरुन सर्व मानवजातीच्या पापक्षमेसाठी स्वतःचे रक्त सांडले, क्रुसावर मरण पत्करले या सर्व गोष्टींचे स्मरण करणे म्हणजे पवित्र प्रभू भोजन विधी आहे. पण काही समाजकंटक जाणिवपूर्वक पवित्र प्रभू भोजन विधीचा अपमान करित आहेत. तरी अशा सर्व समाज विधातक घटकांवर कडक कारवाई करण्यात यावी. बेकायदेशीररित्या चर्चमध्ये प्रवेश करुन प्रार्थना थांबवायचे अधिकार या समाजकंटकांना कोणी दिले? याची चौकशी व्हावी व सर्व ख्रिस्ती धर्मगुरूंना संरक्षण मिळावे. ख्रिस्ती बांधवांनी एकत्रीत येवून उपासना करणे, धर्म प्रसार करणे, धर्म विश्वास स्वइच्छेने स्विकारणे, त्याप्रमाणे जगणे हा भारतीय संविधानातील कलम २५ ते २८ प्रमाणे हा अधिकार भारतातील प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्यघटनेने दिला आहे. त्याप्रमाणे ख्रिस्ती समूदाय प्रभू येशूची उपासना करित असतात, पण काही समाज कंटक बेकायेशीरपणे चर्चेमध्ये, घरामध्ये उपासना चालू असताना विनाकारण उपासना बंद करायला लावून त्याचे व्हिडिओ काढून ते चुकीच्या पद्धतीने सर्वांसमोर मांडतात. ख्रिस्ती प्रार्थनेस जादूटोण्याचे स्वरुप देऊन ख्रिस्ती धर्मगुरूंवर खोटे आरोप करतात, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.