ग्राहक न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका
सांगली : खरा पंचनामा
कर्जाची परतफेड करूनही तारण ठेवलेली कागदपत्रे अनेकदा मागणी करूनही परत देणेस टाळाटाळ करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया ला ५००० रुपये नुकसान भरपाई म्हणून ग्राहकाला देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मुकुंद दाते , अश्फाक नायकवडी व एन.व्ही. देशमुख यांनी दिले. तक्रारदारांतर्फे ॲड. रणजीत कुलकर्णी व ॲड. सुप्रिया कुलकर्णी यांनी काम पाहिले.
यात तक्रारदार सुरेश दड्डिकर यांनी स्टेट बँकेकडून सन २०१० मध्ये गृह कर्ज घेतले होते व जमिनीची कागदपत्रे त्यासाठी तारण ठेवली होती. सन २०१२ मध्येच कर्जाची पूर्ण परतफेड ही त्यांनी केली होती. ही कर्जाची परतफेड बँकेने घालून दिलेल्या मुदतीच्या आधीच झाली होती. कर्जफेड पूर्ण झाल्यानंतर श्री दड्डीकर यांनी बँकेकडे अनेक वेळा जमिनीच्या कागदपत्रांची मागणी केली. प्रत्येक वेळेस बँकेने विविध कारणे देऊन सदरची कागदपत्रे परत देणेस टाळाटाळ केल्याने दड्डीकर यांनी बँकेस कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यास बँकेने उत्तर देऊन बारा हजार रुपये भरून कागदपत्रे घेऊन जाणे विषयी कळवले. 12000 ची रक्कम कोणत्या कारणासाठी आकारली याबाबतचा कोणताही खुलासा बँकेने केला नाही. म्हणून दड्डीकर यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती.
यात दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन निकाल देताना कोणतेही संयुक्तिक कारण न देता व कोणताही खुलासा न करता अशा प्रकारे बँकेस अवाजवी चार्जेस आकारता येणार नसल्याचे ग्राहक न्यायालयाने स्पष्ट करून बँकेची बारा हजार रुपये भरण्याची मागणी फेटाळून लावली शिवाय
या काळात झालेल्या मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपयांचा दंड बॅंकेला ठोठावला. तसेच पुन्हा अशा प्रकारची सदोष सेवा बँकेकडून दिली जाऊ नये याबाबतची ताकीदही न्यायालयाने आदेशात दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.