लाचप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक, शिपाई आणि खासगी व्यक्तीला अटक
सोलापूर : खरा पंचनामा
गुन्ह्यामध्ये नावापुरती अटक करुन जामिनावर सोडण्यासाठी 30 हजार रुपये लाच घेताना बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस शिपाई आणि चहा कॅन्टीन चालवणाऱ्या व्यक्तीला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. सोलापूर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खूने (वय 35), पोलीस शिपाई बोधमवाड (वय 31) आणि चहा कॅन्टीन चालक हसन सय्यद (वय 65) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत एका व्यक्तीने सोलापूर एसीबीकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार आणि त्यांच्या भावाविरुद्ध पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्यामध्ये दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. गुन्ह्यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या भावाला नॉमिनल अटक करुन जामिनावर सोडवण्यासाठी तपासी अधिकारी नागनाथ खूने आणि पोलीस शिपाई सुनील बोधमवाड यांनी प्रत्येकी 15 हजार असे एकूण 30 हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सोलापूर एसीबीकडे तक्रार केली. सोलापूर एसीबीच्या पथकाने 28 डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता सहायक पोलीस निरीक्षक खूने आणि पोलीस शिपाई बोधमवाड यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच लाचेची रक्कम चहा कॅन्टीन चालवणाऱ्या हसन सय्यद याच्याकडे देण्यास सांगितले.
बुधवारी सापळा रचण्यात आला. हसन सय्यद याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची 30 हजार रुपये रक्कम घेताना रंगेहात पकडले. यानंतर नागनाथ खूने आणि सुनिल बोधमवाड यांना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई सोलापूर एसीबीचे
पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, कुमार सोनवणे, प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, गजानन किनगी, सलीम मुल्ला यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.