Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत पुरपट्ट्यातील नाट्यगृहासाठी 25 कोटी मंजूर

सांगलीत पुरपट्ट्यातील नाट्यगृहासाठी 25 कोटी मंजूर



सांगली : खरा पंचनामा

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे सांगलीतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंद आहे. आज अखेर पुरपट्ट्यातील श्यामरावनगर येथील नाट्यगृह उभारण्यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे.

शामरावनगर येथील नाट्यगृहासाठी ३७.५० कोटींचा आराखडाही तयार केला. अखेर राज्याच्या अर्थसंकल्पात सांगलीतील नाट्यगृहासाठी २५ कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. नाट्यपंढरी म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीत नाट्यगृहाची अवस्था बिकट आहे. विष्णुदास भावे नाट्यगृह वगळता एकही चांगले नाट्यगृह नाही. महापालिकेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. शहरात 2019 मध्ये आलेल्या महापुरानंतर नाट्यगृह बंदच पडले आहे. त्यात रंगमंच, वातानुकूलित यंत्रणा, ध्वनी यंत्रणा चांगली नसल्याने महापालिकेच्या नाट्यगृहात नाटकांचे प्रयोगच झाले नाही. लावणी व इतर कार्यक्रमापुरतेच हे नाट्यगृह उरले होते.

राज्यातील सत्ताधारी पक्षातील लोकांनी नव्या नाट्यगृहासाठी पाठपुरावा केला. महापालिकेने ३७.५० कोटींचा आराखडा तयार करून शासनाला सादर केला. भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने निधीची मागणी केली. अखेर अर्थसंकल्पात नाट्यगृहासाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.

प्रस्तावानुसार श्यामरावनगरमधील आठ एकर जागेत नाट्यगृह, ओपन लॉन, बहुद्देशीय सभागृह, अम्पीथिएटर उभारले जाणार आहे.
नाट्यगृहाची क्षमता ७५० इतकी आहे. ३७० दुचाकी व ११२ चारचाकी वाहनासाठी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. गुलमोहर, बहावा, सप्तपर्णी, रक्तचंदन आदी विविध प्रकारांची ५०० हून अधिक झाडे या परिसरात लावण्यात येणार आहेत. तळमजल्यासह दुमजली इमारत असणार आहे. नाट्यगृहाच्या दोन्ही मजल्यावर प्रत्येकी ३७५ आसनक्षमता असणार आहे. तळमजल्यावर एक हजार क्षमतेचे सभागृह व उपहारगृह उभारण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर नाट्यगृह, कलाकरांसाठी रुम, दुसऱ्या मजल्यावर चार व्हीआयपी सुट व विश्रांतीगृह यात प्रस्तावित आहे.

नाट्यगृहाच्या आवारात खुले लॉनची निर्मिती केली जाणार आहे. त्याची क्षमता २००० लोकांची आहे, तर ४०० आसनक्षमता असलेले अम्पीथिएटरही उभारले जाणार आहे. त्यावर ३६.३५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.