Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गव्याच्या हल्ल्यात माजी उपसरपंच ठार!

गव्याच्या हल्ल्यात माजी उपसरपंच ठार! 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथील माजी उपसरपंचांचा गव्याच्या हल्ल्यात आज मृत्यू झाला. त्यांच्या छातीत गव्याचे शिंग घुसले होते. त्यांना तात्काळ कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

माणिक बळवंत पाटील (वय ४८) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर गवा त्याच शेतात थांबून होता. पळापळीने दमछाक झालेला गवा सुमारे तीन तास शेतातच बसून होता. सायंकाळी वन विभागाने रेस्क्यू फोर्सच्या मदतीने गव्याला डोंगरात हुसकावून लावले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला. 

गेले दोन दिवस परिसरात गव्याचे दर्शन होत आहे. वाघजाई डोंगर परिसरात नेहमीच गवा पहावयास मिळतो. दोन दिवस वाघजाई डोंगर, पडळ, माजगाव येथील डोंगर व शेतातून गवा पहावयास मिळत आहे. हा गवा रविवारी दुपारी कसबा ठाणे परिसरात आला होता. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास माणिक पाटील त्यांच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते. वैरण कापत असताना बिथरलेला गवा अचानक समोर आला आणि त्याने माणिक पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या छातीत गव्याने शिंग खुपसले. आरडाओरडा ऐकून आसपासच्या शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाटील यांना कोल्हापूर येथील सीपीआर येथे हलवले; पण तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सीपीआरमधील डॉक्टरांची, नातेवाईकांची भेट घेतली. वनविभागाला सूचना देऊन आर्थिक मदतीसाठी कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.