Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गोव्याचा महसूल वाढवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेते सक्रिय? एक्साईजच्या कोल्हापूर विभागीय उपायुक्त नियुक्तीसाठी चालढकल

गोव्याचा महसूल वाढवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेते सक्रिय?
एक्साईजच्या कोल्हापूर विभागीय उपायुक्त नियुक्तीसाठी चालढकल



कोल्हापूर : खरा पंचनामा

गोवा बनावटीच्या दारूची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. एक्साईज आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईतून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होत आहे. अशातच एक्साईजच्या कोल्हापूर विभागीय उपायुक्त पद गेल्या 10 ते 11 महिन्यांपासून रिक्तच आहे. याकडे पश्चिम महाराष्ट्रातील एकाही नेत्याने आजपर्यंत लक्ष दिलेले नाही. कोल्हापूर विभागातच या खात्याचे मंत्री महोदयांचा मतदारसंघही येतो. अधिकारी उपलब्ध असूनही फक्त गोव्याचा महसूल वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेते काम करतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयात सध्या मार्च एन्डची धावपळ सुरू आहे. महसूल, एक्साईज यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र एक्साईजच्या अधिकाऱ्यांना त्यासाठी खूपच धावपळ करावी लागत आहे. त्यातच बार आणि दारू दुकानांच्या परवाना नूतनीकरण शुल्कात भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारे गोवा राज्यात रितसर कर, अन्य शुल्क भरून दारू खरेदी करतात. त्यामुळे गोव्याच्या उत्पादन शुल्क विभागाचा महसूल दिवसेंदिवस वाढतच आहे. गोव्यात अत्यल्प दरात खरेदी केलेली दारू महाराष्ट्रात तस्करीद्वारे आणून त्याची विक्री केली जात आहे.

गोवा बनावटीची स्वस्तातील दारू मिळत असल्याने महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी असलेल्या दारूचा खप कमी झाला आहे. त्यामुळे बिअर बार, दारू दुकानांना याचा फटका बसत आहे. गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी नाके मजबूत करण्याची गरज आहे.

मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांचा कार्यभार असणारे कोल्हापूर विभागीय उपायुक्त पद गेल्या 10 ते 11 महिने रिक्त आहे. सिंधुदुर्ग एक्साईजच्या अधिक्षकांकडे या पदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी हे पद तातडीने भरणे गरजेचे आहे.

काही अधिकाऱ्यांच्या लागेबांधे कारणीभूत?
दरम्यान कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त पद न भरता तस्करांना मदत करण्यासाठी खात्यातीलच काही अधिकारी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. पण राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणीही ब्र शब्द काढत नाही. खात्यातीलच लोक सहभागी असतील तर तस्करी कशी रोखायची? तसेच कोल्हापूरचे उपायुक्त पद तस्करांना मदत करण्यासाठीच भरले जात नाही का? असा प्रश्न खात्यातील लोकांसह, बार, दारू दुकान चालक विचारत आहेत.

राज्याचे भरारी पथक करते काय?
दरम्यान सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे येथील एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी कंटेनरमधून तस्करी होणारी कोट्यवधी रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. स्थानिक पातळीवर कारवाई होत असताना राज्याचे भरारी पथक काय करते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मंत्री महोदयांच्या घोषणेनंतरही कारवाई नाही
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी गोव्यातून एक जरी दारूची बाटली आणली तर मोका अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली. त्यानंतर गोवा बनावटीची दारू आणणाऱ्या किती लोकांवर मोका कारवाई करण्यात आली? असेही आता विचारले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.