Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई

आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक : सांगली एलसीबीची कारवाई 



सांगली : खरा पंचनामा

महाराष्ट्रासह कनार्टक राज्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. त्यांच्याकडून चोरीतील सव्वापाच लाख रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

अक्षय लक्ष्मण कांबळे (वय 27, रा. हुळ्ळे प्लॉट सुभाषनगर, मिरज), महंमदहुसेन ऊर्फ हनीसिंग ऊर्फ मच्छर महंमदगौस शेख (वय 26, रा. धारवाड, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी घरफोडीतील संशयित गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश एलसीबीला दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक खास पथक तयार केले होते.  

अक्षय कांबळे हा त्याच्या मित्रासोबत चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी जाणार असून तो सुभाषनगर येथील हुळ्ळे प्लॉट येथील कमानीजवळ थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे सापळा रचून अक्षय आणि त्याचा मित्र महंमदहुसेन शेख या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळील पिशवीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये दागिने सापडले. त्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगलीतील विश्रामबाग, सांगली, कुपवाड, बामणी, कोरोची (ता. हातकणंगले) येथून ते चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे सव्वापाच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून विश्रामबाग, कुपवाड, मिरज ग्रामीण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथील घऱफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. 

पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, दीपक गायकवाड, चेतन महाजन, सचिन धोत्रे, कुबेर खोत, संदीप नलवडे, प्रशांत माळी, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.