मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल मराठीत उपलब्ध!
मुंबई : खरा पंचनामा
मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल आता मराठीतूनही उपलब्ध होणार आहेत. बुधवारपासून उच्च न्यायालयाने आपल्या वेबसाईटवर निकाल मराठीतूनही अपलोड करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाईटवर एक स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिथं नागरीकांना हायकोर्टानं दिलेले निकाल मराठीतूनही वाचता येतील.
मात्र सध्या हा पर्याय काही ठराविक निकालांकरताच उपलब्ध असल्यानं तो 'निवडक निर्णय' या शिर्षकाखाली तयार करण्यात आला आहे. बाकी हायकोर्टाचे सर्व निकाल हे नेहमीप्रमाणे इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील.
पहिल्या दिवशी यात 20 फेब्रुवारी रोजी न्या. धीरज सिंह ठाकूर आणि न्या. कमला खाता, न्या. धीरज सिंह ठाकूर आणि न्या. अभय अहुजा आणि न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठानं दिलेले नुकतेच निकाल मराठीतून उपलब्ध करण्यात आले आहेत.
या निकालांवर खासकरून लिहिण्यात आलंय, की मराठीतील या निकालांचा वापर मर्यादीत स्वरूपाचा असून नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत निकाल हे त्यांना ते योग्यरितीनं समजावेत यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी 25 जानेवारी ही न्यायालयांशी निगडीत या नव्या सेवेचं लोकार्पण केलं होतं. ज्यातनं सर्वोच्च न्यायालयातील निकालही देशातील विविध स्थानिक भाषांत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सेवेतून सध्यातरी 2 हजार 900 निकाल हे मराठीसह अन्य भारतीय भाषांतून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जातील, असं सांगितलं होतं. सरन्यायाधीशांच्या या घोषणेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वागत केले. तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल इंग्रजीत आहेत आणि 99.9 टक्के लोकांना ते समजू शकत नाहीत, असं सरन्यायाधीश चंद्रचूड काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे भाषांतर करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणाही सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केली होती. न्यायमूर्ती अभय ओका यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.