क्रिप्टोकरन्सीतून जादा परताव्याचे आमिष; समडोळीच्या एकावर गुन्हा
सांगली : खरा पंचनामा
डॉक्सी क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून लोकांना दुप्पट लाभाचे आमिष दाखवून १३ लाख ६० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी समडोळीच्या एकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दि. २७ मार्च रोजी भिलवडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. डॉक्सी क्रिप्टोकरन्सी हे आभासी चलन असल्याचे माहित असूनही ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भिमगोंडा ऊर्फ सन्मती कुमगोंडा पाटील (रा. समडोळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. क्रिप्टोकरन्सी हे एक आभासी चलन असल्याचे माहित असूनही पाटील याने स्वतच्या आर्थिक स्वार्थासाठी लोकांकडून रक्कम स्विकारण्याचे अधिकार नसताना त्याने सांगली जिल्ह्यातील अनेकांकडून रोख रक्कम स्विकारली आहे. ती रक्कम डॉक्सी नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दहा महिन्यांत रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष पाटील याने गुंतवणूकदारांना दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडून रोख रक्कम स्विकारली.
रक्कम स्विकारल्यानंतर त्याने गुंतवणुकदारांना त्यांच्या मोबाईलवर क्रिप्टोकरन्सीचे आयडी आणि डॉक्सी नावाचे क्रिप्टोकरन्सीचे क्वाईन दिले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना दिलेल्या हमीप्रमाणे त्यांची गुंतवणुकीची रक्कम तसेच त्याचा परतावा दिलेला नाही. शेअर मार्केट, क्रिप्टोकरन्सी आदीद्वारे लोकांची होणारी फसवणूक रोखण्याकरता पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, अमोल लोहार, विनोद कदम, दीपाली पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
शेअर मार्केट तसेच क्रिप्टोकरन्सी तसेच अन्य माध्यमांद्वारे फसवणूक झाली असल्यास सांगलीतील आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.