Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत महिलेचा निर्घृण खून; घरजागेच्या वादातून घटना तिघांवर संशय, एका अल्पवयीनाचाही समावेश

सांगलीत महिलेचा निर्घृण खून; घरजागेच्या वादातून घटना
तिघांवर संशय, एका अल्पवयीनाचाही समावेश



सांगली : खरा पंचनामा

शहरातील वानलेसवाडी येथील गल्ली क्रमांक आठमधील हायस्कूल रोड परिसरात एका महिलेच्या डोक्यावर, मानेवर, चेहऱ्यावर कोयत्यासह अन्य धारदार शस्त्रांनी वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान घरजागेच्या वादातून भावकीतीलच तीन तरूणांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये एका अल्पवयीनाचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

संगीता राजाराम मासाळ (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीता यांच्या पतीचे काही वषापूर्वी निधन झाले आहे. मासाळ कुटुंब मूळचे जत तालुक्यातील बाज येथील आहे. ते गेल्या कित्येक वर्षांपासून सांगलीत वानलेसवाडी येथे स्थायिक झाले आहेत. संगीता यांना दोन मुली, एक मुलगा आहे. त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाली आहेत. मुलगा किरण हा त्यांच्यासमवेत रहात असून तो अद्याप अविवाहीत आहे. 

संगीता यांच्या भावकीतीलच काही लोक वानलेसवाडी येथे त्यांच्या घराजवळ राहण्यास आहेत. वानलेसवाडी येथील जागेवरून त्यांचा भावकीतील लोकांशी काही महिन्यांपासून वाद सुरू होता. रविवारी दुपारी संगीता यांचा मुलगा किरण जेवण करून घराबाहेर गेला होता. त्यावेळी संशयित त्यांच्या घरी आले. संगीता जेवण करत असताना हल्लेखोरांनी कोयत्यासह अन्य धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. संगीता यांच्या मान, डोके, चेहऱ्यावर गंभीर वार झाले. त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पलायन केले. यावेळी हल्लेखोरांनी घटनास्थळीच हल्ल्यातील कोयता फेकून दिला होता. 

या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.