Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या बुकीसह चौघांना अटक; 2.80 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई

क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या बुकीसह चौघांना अटक; 2.80 लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या बुकीसह चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून लॅपटॉप, 9 मोबाईल, 3 दुचाकी असा 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कुपवाड-वाघमोडेनगर रस्त्यावरील एका शेतातील शेडमध्ये सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

विश्वनाथ संजय खांडेकर (वय 22, रा. वारणाली, सांगली), रतन सिद्धू बनसोडे (वय 27, रा. कुपवाड), गणेश मल्लाप्पा कोळी (वय 21, रा. वारणाली, सांगली), संतोष सुरेश घाडगे (वय 19, रा. विश्रामबाग, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या बुकिंसह खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीला दिले होते. त्यानुसार निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांचे एक पथक तयार केले होते.

सोमवारी रात्री पथकाला कुपवाड येथील वाघमोडेनगर रस्त्यावरील एका शेतातील शेडमध्ये काहीजण क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे छापा टाकला. त्यावेळी बेटिंग घेणाऱ्या विश्वनाथ खांडेकर याच्यासह चौघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, दुचाकी, डायरी, पेन असे साहित्य जप्त केले. त्यांना अटक करण्यात आली. याबाबत कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, दीपक गायकवाड, प्रशांत माळी, संदीप पाटील, आर्यन देशिंगकर, संजय कांबळे, गौतम कांबळे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बेटिंग लावणाऱ्या 23 जणांचा शोध सुरू
दरम्यान घटनास्थळी पथकाला एक डायरी मिळाली आहे. त्यामध्ये बेटिंग लावणाऱ्या 23 जणांची नावे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक मिळाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.