13 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात : 3 हवालदारांवर गुन्हा
पुणे : खरा पंचनामा
कारला झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याला सहाय्य करणाऱ्या अन्य दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार जयराम सावलकर आणि पोलीस हवालदार विनायक मुधोळकर अशी गुन्हा दाखल झालेल्या अन्य दोघांची नावे आहेत.
तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तिघा संशयितांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली.
याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर सोमवारी त्याची पडताळणी केली. त्यात त्यांनी तडजोड करुन 13 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. रात्री उशिरापर्यंत पोलीस नजर ठेवून होते. पोलिसांनी तक्रारदार याची तक्रार मध्यरात्रीनंतर दाखल करुन घेतली. त्यानंतर हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून 13 हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीक्षित याला रंगेहात पकडण्यात आले. दीक्षित याला अटक केली असून त्याच्यासह तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.