Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नशेच्या गोळ्या विक्री : मुख्य औषध विक्रेत्यासह एमआरला अटक सांगली एलसीबीची कारवाई

नशेच्या गोळ्या विक्री : मुख्य औषध विक्रेत्यासह एमआरला अटक
सांगली एलसीबीची कारवाई सांगली : खरा पंचनामा

सांगलीसह मिरज शहरात नशेच्या गोळ्या विक्री केल्याप्रकरणातील पसार झालेल्या संशयितासह या गोळ्यांचा मुख्य औषध विक्रेता आणि एक एमआर (वैद्यकीय प्रतिनिधी) अशा तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगली एलसीबीच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. 

शाहबाज ऊर्फ जॅग्वार रियाज शेख (वय २४, रा. कर्नाळ रोड सांगली), एमआर सचिन सजेर्राव पाटील (वय २९, रा. वंजारवाडी, ता. तासगाव), मुख्य औषध विक्रेता अमोल शहाजी चव्हाण (वय ३८, रा. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात नशेखोरीमुळे गुन्ह्यांत वाढ झाल्याने दि. १० मे रोजी जिल्हाधिकारी डाॅ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांच्या उपस्थितीत केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना या गोळ्या विक्री न करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. 

त्यानंतर सांगली शहर, मिरज शहर आणि महात्मा गांधी पोलिस ठाण्यात दाखल नशेच्या गोळ्यांच्या गुन्ह्यातील पसार असलेला शाहबाज शेख कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौक परिसरात येणार असल्याची माहिती एलसीबीचे विक्रम खोत यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांनी निरीक्षक शिंदे यांच्या सूचनेनुसार पथकासोबत सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने अनिकेत कुकडे, उमर महात यांना नायट्रोव्हेटच्या २५० गोळ्या विकल्याची कबुली दिली. मिरजेतील राहुल माने याला ६८ गोळ्या, गौस बागवान याला ८० गोळ्यांची विक्री केली होती. शाहबाज याच्याकडे या गोळ्यांबाबत चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या ओळखीचा एमआर सचिन पाटील औषध विक्रेता अमोल चव्हाण याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर एमआर. सचिन पाटील, विक्रेता अमोल चव्हाण यांना अटक करण्यात आली. 

तिघांनीही कोणत्याही डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तसेच त्याचे रेकॉर्ड न ठेवता या गोळ्या विकल्याचे स्पष्ट झाले. तिघांनाही सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक विशाल येळेकर, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, विक्रम खोत, अजय बेंदरे, सागर लवटे, बिरोबा नरळे, संदीप गुरव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.