चेन स्नॅचरसह दुचाकी चोरट्यांच्या टोळीला अटक, पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
तासगाव पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे ऐवज लंपास करणारे चेन स्नॅचर आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. या टोळीकडून दागिने तसेच तीन दुचाकी असा पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती तासगावचे पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.
युवराज किसन चव्हाण (वय २३, रा. कुंडल), रोहित तिप्पन्ना चव्हाण (वय १९, रा. कुंडल), अक्षय विकास लाड (वय २४, रा. कुंडल), विनोद किसन चव्हाण (वय १९, रा. कुंडल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तासगावचे निरीक्षक श्री. वाघ यांनी पदभार स्विकारल्यानंतर चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार पथक चोरट्यांचा शोध घेत होते.
दि. २१ जुलै रोजी अश्विनी पाटील या पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चेन हिसडा मारून लंपास केली होती. त्यावेळी चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच तासगाव आणि विटा येथेही असेच गुन्हे केल्याची कबुली दिली. शिवाय तीन दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचे दागिने, तीन दुचाकी असा पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक झेंडे, नितीन केराम, उपनिरीक्षक एन. एल. तारडे, अविनाश घोरपडे, अमित परीट, सुनील चौधरी, अमोल चव्हाण, समीर आवळे, विवेक यादव, संतोष सूर्यवंशी, रमेश ठोंबरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.