कार्वे येथे शेतातील घर फोडून दागिने चोरणाऱ्यास अटक
विटा पोलिसांची कारवाई : ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त
विटा : खरा पंचनामा
खानापूर तालुक्यातील कार्वे येथील शेतातील बंद घर फोडून त्यातील दागिने चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. विटा पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान त्याच्याकडून ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याने आणखी दोन गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.
बबल्या पपल्या शिंदे (वय २६, रा. खडकी, ता. मंगळवेढा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विट्याचे निरीक्षक श्री. डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दि. ३१ मे रोजी रात्री कार्वे येथील शहाजी हारूगडे यांच्या मित्राच्या शेतातील बंद घर फोडून मोबाईल आणि चांदीचे दागिने चोरलेला संशयित तुरची फाटा येथे येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.
पथकाने तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने कार्वे येथील चोरीची कबुली दिली. शिवाय अन्य दोन गुन्ह्यांचीही कबुली दिली. त्याच्याकडून ८७ हजारांचे दागिने, मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, गणपत गावडे, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.