Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

त्या जीआरमध्ये अर्थमंत्र्यांचे नावच नाही : शिंदे गटात अस्वस्थता

त्या जीआरमध्ये अर्थमंत्र्यांचे नावच नाही : शिंदे गटात अस्वस्थतामुंबई : खरा पंचनामा

दि. 2 जुलै रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर मंत्रीपद वाटणी कशी होणार? याची जोरदार चर्चा चालू असतानाच एक सरकारी जीआर सध्या चर्चेत आला आहे.

एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीमंडळ विस्तार गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असताना दुसरीकडे अजित पवारांसह ९ आमदारांनी सत्तेत येताच मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे सत्तेतील शिंदेगट आणि भाजपामधल्या मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे सरकारमध्ये अर्थमंत्रीपद सांभाळणाऱ्या अजित पवारांना पुन्हा अर्थमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. त्याचसंदर्भात सरकारच्या नव्या जीआरवरून तर्क- वितर्क लावले जात आहेत.

अजित पवार अर्थमंत्री असताना शिंदे गटातील आमदारांना निधी देण्यात आला नसल्याची तक्रार करत शिवसेनेत फूट पडली. मात्र, आता पुन्हा अजित पवारांनाच अर्थमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. दि. 7 जुलै रोजी राज्य सरकारनं काढलेल्या एका जीआरमध्ये अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेखच नसल्याचं पाहायला मिळत आहे.

मे महिन्यात झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदर सवलत देण्यासाठी संबंधित विभागाने प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी उर्जामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांची यादी या जीआरमध्ये देण्यात आली असून त्यात वित्तमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नावच नाहीये.

या यादीत पाच सदस्यांची नावं आहेत. यामध्ये उपसमितीचे अध्यक्ष म्हणून पहिलं नाव उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांचं आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर फक्त 'मंत्री (वित्त)' एवढंच लिहिलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर सुधीर मुनगंटीवार, चौथ्या क्रमांकावर उदय सामंत तर पाचव्या क्रमांकावर अतुल सावे यांचं नाव आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.