ठाकरे, शिंदे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पाठवली नोटीस!
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेनेच्या १६ आमदार निलंबन प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
अपात्रतेची टांगता तलवार असलेल्या १६ आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, लता सोनवणे, रमेश बोरनाळे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, बालाजी किणीकर आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.
राज्यातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले जावेत, अशा विनंतीची याचिका नुकतीच शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या उलथापालथी सुरू असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या गटाने शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला महत्त्व आले आहे. १६ बंडखोरांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यास राहुल नार्वेकर यांनी विलंब केला असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गट मिळून एकूण ५४ आमदारांना नोटीस बजावली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.