Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील तीन व्यापाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा! गुजरातच्या अहमदाबादमधील दोघांवर गुन्हा

सांगलीतील तीन व्यापाऱ्यांना सव्वादोन कोटींचा गंडा!
गुजरातच्या अहमदाबादमधील दोघांवर गुन्हा 



सांगली : खरा पंचनामा

सांगलीतील दोन व्यापारी बंधूंकडून हळद, बेदाणा खरेदी करून त्याचे पैसे परत दिले नाहीत. तसेच व्यवसायात अडचण असल्याचे सांगून एकाकडून २५ लाख रूपये उसने घेऊन या तिघांचीही तब्बल दोन कोटी, ३४ लाख १७ हजार ६५२ फसवणूक करण्यात आली आहे. २०१५ ते २०२० या काळात ही घटना घडली. सांगलीतील तिघांना गंडा घातल्याप्रकरणी गुजरात येथील अहमदाबादमधील दोन व्यापारी बंधूंवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अंकितकुमार अमृतलाल पटेल, जयकुमार अमृतलाल पटेल (दोघेही रा. अहमदाबाद, गुजरात) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिलकुमार ईश्वरलाल पटेल (वय ५८, रा. ८० फुटी रोड, विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. अनिलकुमार यांची सांगलीतील मार्केट यार्ड येथे ईश्वरलाल पटेल नावाची फर्म आहे. तर त्यांचा भाऊ अशोककुमार पटेल यांची सोमनाथ ट्रेडर्स नावाची फर्म आहे. या दोन्ही संशयितांनी त्यांच्याकडून १३ कोटी ९१ लाख ७ हजार ९०६ रूपयांचा हळद आणि बेदाणा  खरेदी केला होता.  

या दोघांकडून घेतलेल्या मालाचे काही पैसे त्यांनी परत केले होते. मात्र त्यांची २ कोटी ९ लाख १७ हजार ६५२ रूपये इतकी रक्कम त्यांनी परत केली नाही. या दोन्ही भावांनी त्यांच्याकडे वारंवार तगादा लावला तरीही त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान अनिलकुमार पटेल यांचे मित्र प्रकाश बसगोंडा पाटील यांना संशयितांनी व्यवसायात अडचण असल्याचे सांगून त्यांच्याकडून २५ लाख रूपये उसने घेतले होते. तेही त्यांनी परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिलकुमार पटेल यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुजरातच्या पटेल बंधूंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.