जखमी मोराला नेले दुचाकीवरुन!
वनविभागाच्या हलगर्जी पणामुळे गेला मोराचा जीव
सांगली : खरा पंचनामा
कुपवाड येथे जखमी अवस्थेत मोराला नेण्यासाठी वनविभागाकडे चारचाकी नसल्याने दुचाकीवरून हेळसांड करत नेण्यात आले. सुटीच्या एन्जॉय करणाऱ्या वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. वनविभागाच्या हलगर्जी पणामुळे त्या मोराचा जीव गेला.
राष्ट्रीय पक्ष्याबाबत वनविभागाचा हा भोंगळ कारभार आणि निर्लज्जपणा नागरीकांनी उघड्या डोळ्याने पाहिला. प्राणीप्रेमींनी या प्रतापाचा व्हिडिओ करत व्हायरल केल्याने नेटकऱ्यातूनही टिकेची झोड उठवली आहे. कुपवाड परिसरात एका ठिकाणी मोर जखमी अवस्थेत निपचीत पडला होता. काही नागरीकांनी तातडीने वनविभागास याबाबत माहिती कळवली. अनंतचतुर्दशीपासून सरकारी कार्यालयाना पाच दिवसाची सुटी आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारीही त्याच एन्जॉय मुडमध्ये असल्याचे यावेळी दिसून आले.
चारचाकी चालक उपलब्ध नसल्याने दोन वनमजूर दुचाकीवरून घटनास्थळी गेले. त्यांनी प्राथमिक पाहणी केली. त्यावेळी मोर बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले. अखेर त्या वनमजूरांनी त्या मोराला टॉवेलमध्ये गुंडाळून दुचाकीवरून नेले. त्याचा पिसारा रस्त्यावरून लोळत निघाला. तेवढ्यात तो मोर शुद्धीत आला. आणि तो तडफडू लागला. मात्र हे दोघे महाशय गाडी थांबवायला तयार नव्हते. त्या मोराची हेळसांड करत त्यांनी त्याला वनविभागाच्या कार्यालयात नेले. त्याठिकाणी डॉक्टरही नेहमीप्रमाणे उशीरा आले. तोवर त्या मोराने तडफडून जीव सोडला.
हा सारा प्रकार नागरीक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी कॅमेराबद्ध केला. त्यानंतर क्षणात हा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. राष्ट्रीय पक्ष्यांची अशा पद्धतीने होणारी हेळसांड पाहून नागरीकांनी आणि नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला. अक्षरशः वनविभागाच्या कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरूवात केली आहे. निर्लज्ज वनविभागाच्या प्रशासन आणखी किती राष्ट्रीय पक्ष्यांचा जीव घेणार असा संतप्त सवाल प्राणीमित्रांनी उपस्थित केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.