एएस ट्रेडर्स फसवणुकीचा मुख्य सूत्रधार, पलूसच्या लोहितसिंग सुभेदार याला अटक
कोल्हापूर : खरा पंचनामा
गुंतवणूकदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला एएस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख आणि फसवणुकीचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याला अखेर पोलिसांनी जेरबंद केले. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी त्याला कोल्हापूर जिल्हयातून अटक केली. या कारवाईमुळे गुन्हे दाखल असलेले अन्य संचालक आणि एजंटचे धाबे दणाणले आहेत.
कमी कालावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम ए एस ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांना परत केली नाही. ऑक्टोबर २०२२ पासून परतावे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. नोवहेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात ए एस ट्रेडर्स कंपनीसह २७ संचालक आणि एजंटवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून कंपनीचा प्रमुख आणि फसवणुकीच्या मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार अटक टाळण्यासाठी धावपळ करीत होता. सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने स्वतःहून पोलिसात हजार होणार असल्याची माहिती ऑनलाइन मीटिंगद्वारे गुंतवणूकदारांना दिली होती. मात्र, त्यानंतरही तो पोलिसांपासून पळ काढत होता.
गणपतीचे दर्शन घेण्यासाठी तो मंगळवारी कोल्हापूर जिल्हयात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने गेल्या चार महिन्यांपासून या गुन्ह्यांतील नऊव्या संशयितास अटक केली. मुख्य सूत्रधाराच्या अटकेमुळे आता अन्य संचालक आणि संशयितही लवकरच हाती लागतील असे पोलिसांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.