Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

स्वतःच्याच दुकानात चोरी करणाऱ्यासह दोघांना अटक इन्शूरन्सचे पैसे मिळवण्यासाठी रचला होता बनाव, सांगली एलसीबीची कारवाई

स्वतःच्याच दुकानात चोरी करणाऱ्यासह दोघांना अटक
इन्शूरन्सचे पैसे मिळवण्यासाठी रचला होता बनाव, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

स्पोर्ट्सच्या दुकानात व्यवसाय होत नसल्याने इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वतच्याच दुकानातील स्पोर्ट्स शूजची चोरी करणाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली. हा गुन्हा उघडकीस आल्याने फिर्यादिच आरोपी झाला आहे. 

अक्षय संजय बोगारे (वय २१, रा. विजयनगर, सांगली, मूळ, रा. कळंबा तर्फ ठाणे, ता. करवीर), दुकानाचा मालक आकाश प्रकाश सूर्यवंशी (वय २६, रा. इनाम धामणी, ता. मिरज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सूर्यवंशी याचे विश्रामबाग येथे स्पोर्ट्स वस्तू विक्रीचे दुकान आहे. बुधवार दि. ४ आक्टोबर ते दि. ६ आक्टोबर दरम्यान हे दुकाना फोडून अज्ञातांनी महागडे स्पोर्ट्स शूज लंपास केल्याची सूर्यवंशी याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली होती. या चोरीचा तातडीने तपास करण्याच्या सूचना निरीक्षक शिंदे यांनी दिल्या होत्या.  

सहायक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील विक्रम खोत यांना ही चोरी सूर्यवंशी यानेच इन्शूरन्सचे पैसे मिळवण्यासाठी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार पथक त्यांचा शोध घेत असताना शंभर फुटी रस्ता परिसरात दोघेजण दुचाकीवर एक पोते घेऊन संशयास्पदरित्या थांबल्याचे दिसून आले. पोत्याची झडती घेतली असता त्यामध्ये स्पोर्ट्स शूज आढळून आले. त्याबाबत पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दुकान तोट्यात सुरू असल्याने इन्शूरन्सचे पैसे मिळवण्यासाठी सूर्यवंशी याने बोगारे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, विक्रम खोत, मच्छिंद्र बर्डे, अमर नरळे, उदय माळी, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.