Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कृषी सेवा केंद्र चालकाकडून खंडणी मागणाऱ्या ५ जणांवर गुन्हा, तिघांना अटक! घोटाळा केल्याचा आरोप करत उकळले ७.५ लाख उकळले

कृषी सेवा केंद्र चालकाकडून खंडणी मागणाऱ्या ५ जणांवर गुन्हा, तिघांना अटक!
घोटाळा केल्याचा आरोप करत उकळले ७.५ लाख उकळले



सांगली : खरा पंचनामा

कृषी सेवा केंद्र चालवणाऱ्या एकाला ७ ते ८ कोटींचा घोटाळा केल्याच्या बदल्यात १५ लाखांची खंडणी मागून त्याच्याकडून ७.५ लाखांची खंडणी उकळणाऱ्या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार, जीप जप्त करण्यात आली आहे. तिघांनाही तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. 


प्रशांत लक्ष्मण सदामते (वय ३६, रा. अंजनी), विनोद बाळासाहेब मोरे (वय ४२, रा. खंडेराजुरी), मोनिश संजय लोखंडे (वय २४, रा. हातनूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तिघांसह विठ्ठलराव विश्वासराव जाधव, लता विठ्ठलराव जाधव यांच्यावरही खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुकुंद हणमंत जाधवर (वय ३५, रा. विजयनगर) यांनी फिर्याद दिली आहे. 

जाधवर यांचे कृषी सेवा केंद्र आहे. त्यामध्ये त्यांनी ७ ते ८ कोटींचा घोटाळा केला असून ही बाब दडपण्यासाठी १५ लाखांची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी संशयितांनी त्यांना दिली होती. त्यांनी सातत्याने तगादा लावल्याने जाधवर यांनी संशयितांना साडेसात लाख रूपये दिले होते. त्यानंतरही संशयित सातत्याने उरलेल्या पैशांची मागणी करत होते. त्याला कंटाळून जाधवर यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. त्यांच्यावरील उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र गुन्हा सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तो सांगली ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. 

त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रात्री विविध ठिकाणी छापे टाकून तिघा संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार, जीपही जप्त करण्यात आली आहे. सांगली शहरचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सुशांत पाटील, प्रफुल्ल कदम, संतोष माने, मेघराज रूपनर, सुशील मस्के, रणजित घारगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

स्वाभिमान स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी
कृषी सेवा केंद्र चालकाला धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळणारे संशयित स्वाभिमान स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.