Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन हजारांची लाच घेताना तलाठ्यासह दोघांना अटक सातबारा नोंदीसाठी घेतले पैसे, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

दोन हजारांची लाच घेताना तलाठ्यासह दोघांना अटक
सातबारा नोंदीसाठी घेतले पैसे, सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईसांगली : खरा पंचनामा

बक्षीसपत्र केलेल्या जमीनीची सातबारा नोंद घालण्यासाठी पिंपरी खुर्द (ता. आटपाडी) येथील तलाठ्याने खासगी व्यक्तीमार्फत दोन हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शुक्रवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. 

सुधाकर कृष्णा कुंभार (वय ५५, रा. मेंढिगिरी, ता. जत), बाळासो बापूराव पाटील (वय ४२, रा. आटपाडी)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुधाकर कुंभार आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार व्यक्तीच्या वडिलांनी त्यांच्या आईच्या नावे बोंबेवाडी येथील जमीन बक्षीसपत्र करून दिली आहे. त्या जमिनीची सातबारा नोंद घालण्यासाठी तलाठी कुंभार यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रूपये लाचेची मागणी केली. 

मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत दि. २९ डिसेंबर रोजी कुंभार याच्याविरोधात सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने याची पडताळणी केल्यानंतर कुंभार याने लाच मागून ती बाळासो पाटील याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी तक्रारदाराकडून २ हजारांची लाच घेताना बाळासो पाटील याला रंगेहात पकडण्यात आले. तलाठी कुंभार आणि पाटील यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शासकीय, निमशासकीय लोकसेवकांनी लाच मागितल्यास 9821880737 या मोबाईल क्रमांकावर थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपअधीक्षक पाटील यांनी केले आहे. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, धनंजय खाडे, अजित पाटील, सलीम मकानदार, पोपट पाटील, रामहरी वाघमोडे, ऋषिकेश बडणीकर, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, धनंजय खाडे, अतुल मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.