Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू, हे 154 प्रश्न विचारले जाणार

मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू, हे 154 प्रश्न विचारले जाणार



मुंबई : खरा पंचनामा

मंगळवार (23 जानेवारी) पासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे यासंदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून. 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.


महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं जाणार असून यासाठी सव्वा लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात केला गेलाय. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा मुंबईकडे येत असताना मागासवर्ग आयोगाने तातडीने हे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.

मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 26 जानेवारीला मुंबईत येऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाच्या सर्वेक्षणासोबतच जातीनिहाय जनगणनेची मागणी केलेली असताना. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सरकारी यंत्रणांनी वेगाने काम करायला सुरुवात केलीय असं दिसतंय.

सर्वेक्षणात कोणते प्रश्न विचारले जातील?

तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?, लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा नियम आहे का?, जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का? हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून हे सर्वेक्षण केलं जाणार आहे.

मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे. त्यानुसार मुख्यतः पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील.

यातल्या मॉड्यूल ए मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती, तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील.

मॉड्यूल बी मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता? तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे? तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? सध्या तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण 20 प्रश्न असतील. मॉड्यूल 'सी' मध्ये तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

तुमच्या घरात शौचालय आहे का?, तुमच्याकडे शेती आहे का? असेल तर ती कुणाच्या नावावर आहे?, तुमच्या कुटुंबावर किती कर्ज आहे?, मागच्या पंधरा वर्षांमध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता विकली आहे का?

तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी धुणी भांडी, स्वयंपाक, झाडलोट करायला जाते का? असे एकूण 76 प्रश्न असतील. या प्रश्नावलीच्या मॉड्यूल 'डी'मध्ये समाजाचं मागासलेपण तपासलं जाईल.

तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का?, विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का?, तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेतं?, गेल्या दहा वर्षांत तुमच्या कुटुंबातील कुणी आत्महत्या केली आहे का?

असे एकूण 33 प्रश्न असतील.

आणि मॉड्यूल 'ई'मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील. तर असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचे कुटुंब सामाजिक, आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल.

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने अशी माहिती दिलीय की, या सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा तुमच्या घरी सर्वेक्षणासाठी येऊ शकतात, त्यामुळे नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन देखील आयोगाकडून करण्यात आलं आहे.

राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातल्या मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्व्हेक्षण केलं जाणार आहे. हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.