गणवेश परिधान केल्यावर समाजाचे दायित्व लक्षात ठेवा
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी; तुरची येथे दीक्षांत संचलन समारंभ उत्साहात
सांगली ः खरा पंचनामा
प्रशिक्षणार्थी अंमलदारांनी सांघिकपणे कर्तव्य करावे. गणवेश परिधान केला की आपण समाजाचे देणे लागतो हे नेहमी लक्षात ठेवावे. इतरांकडे वाहन, बंगला, जमीन आहे म्हणून आपल्याकडेही त्या बाबी हव्यात अशा अपेक्षा पाल्याकडून पालकांनी ठेवू नयेत. नातेवाईकांची कारणे सांगून गावाकडे बदली मागू नका, असा सल्ला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी प्रशिक्षणार्थी अंमलदारांना दिला.
तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत संचलन समारंभ महानिरीक्षक श्री. फुलारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, सोपवलेली कामे रोजच्या रोज पूर्ण करा. दोषसिद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या कृतीने मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही श्री. फुलारी यावेळी म्हणाले. सुरुवातीला महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी मानवंदना स्विकारली. त्यानंतर प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी अंमलदारांना सेवेची शपथ दिली.
प्राचार्य पाटील यांनी अहवाल वाचन केले. ते म्हणाले, प्रशिक्षणार्थीन्चे आठवे सत्र जून २०२३ रोजी सुरू झाले. त्यामध्ये लोहमार्ग, मुंबई, ठाणे घटकांमधून ५९७ प्रशिक्षणार्थी आले होते. या काळात त्यांना फौजदारी कायदे, कायदा, सुव्यवस्था, विज्ञान व तंत्रज्ञान, पोलिस प्रशासन आदी विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले आहे. तसेच कवायत, परेड, हत्यारांचे तसेच गोळीबाराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जवळच्या पोलिस ठाण्यांना भेटी देऊन ठाणेअंतर्गत कामकाजाचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण केंद्राला शासनाच्या विविध विभागांकडून करण्यात आलेल्या मदतीबद्दल त्यांनी संबंधितांचे आभार व्यक्त केले.
यावेळी प्रशिक्षणादरम्यान प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थीना विविध स्वरूपातील बक्षीसांचे प्रमुख पाहुणे महानिरीक्षक श्री. फुलारी यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यावेळी सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर, पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, जि.प. सदस्य संजय पाटील, उपप्राचार्य सुजय घाटगे, प्रशिक्षणर्थीन्चे पालक, नातेवाईक उपस्थित होते.राजू शिंदे यांनी सूत्रसंचलन केले. उपप्राचार्य उदय डुबल यांनी आभार मानले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.