लिफ्टच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना अटक
रोकड, मोबाईल, दुचाकी जप्त
सांगली ः खरा पंचनामा
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कर्नाटक येथील तरूणाकडील मोबाईल, रोकड लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल, रोकड असा ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली.
गणेश हणमंत पवार (वय २०), सुखदेव अशोक पवार (वय २६, दोघेही रा. कुलकर्णी प्लाॅट, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास जावेद जमादार (रा. हेरीकुडी, जि. बेळगाव) हा मार्केट यार्डकडे निघाला होता. त्यावेळी संशयितांनी त्याला लिफ्ट देतो असे सांगून दुचाकीवर बसवले. नंतर मार्केट यार्ड परिसरात त्याला शिवीगीगाळ करत मारहाण केली. नंतर त्याच्याकडील रोकड आणि मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन दोघेही पसार झाले होते. या घटनेनंतर विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखा चोरट्यांचा शोध घेत होती.
त्यावेळी पथकाला यातील संशयित वडर गल्ली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांना अटक करून त्यांच्याकडून दुचाकी, मोबाईल, रोकड जप्त करण्यात आली.
सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, विश्रामबागचे निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवास कांबळे, मारूती साळुंखे, संदीप साळुंखे, संदीप घस्ते, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, संकेत कानडे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.