साडेतीन हजारांची लाच घेताना महिला तलाठ्यासह कोतवालाला अटक
हरोली येथे सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
वाटणी केलेल्या जमिनीची दस्तानुसार सातबारा उतारा नोंद घालण्यासाठी साडेतीन हजार रूपयांची लाच घेताना हरोली (ता. कवठेमहांकाळ) येथील महिला तलाठ्यासह कोतवालाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई केल्याची माहिती सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
तलाठी प्रतिभा गणपती लोंढे, बनेवाडीचा कोतवाल युवराज उर्फ रामचंद्र मोरे असे अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांचे वडील आणि त्यांच्या चुलत्यांमध्ये शेतजमीनीची वाटणी झाली आहे. त्याबाबत उपनिबंधक कार्यालयातील दस्तानुसार सातबाऱ्यावर नोंद घालायची होती. ती नोंद घालण्यासाठी तलाठी लोंढे आणि कोतवाल मोरे यांनी तक्रारदारांकडे साडेतीन हजार रूपये मागितले. मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लोंढे आणि मोरे यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शुक्रवारी लोंढे आणि मोरे यांना साडेतीन हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शासकीय, निमशासकीय अधिकारी, कमर्चाऱ्यांनी लाच मागितल्यास ९८२१८८०७३७ या मोबाईलवर थेट माझ्य़ाशी संपर्क साधा असे आवाहन उपअधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी, विनायक भिलारे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, ऋषिकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील, रामहरी वाघमोडे, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.