Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कॉन्व्हेंट शाळेतील वादातून विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेणाऱ्या दोन महिला पोलीस निलंबित

कॉन्व्हेंट शाळेतील वादातून विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेणाऱ्या दोन महिला पोलीस निलंबित



सोलापूर : खरा पंचनामा

एका कॉन्व्हेंट इंग्रजी शाळेत शुल्क न भरल्यामुळे एकाच कुटुंबातील चार विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर लिहू दिले नाही. त्याचा जाब विचारला असता पालकासह चारही लहानग्या विद्यार्थ्यांना पोलिसांना बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिसांनीही आपले कर्तव्य योग्य पद्धतीने न बजावता चारही विद्यार्थ्यांना सरकारी वाहनात बसवून थेट पोलीस ठाण्यात आणून तासभर थांबवून ठेवले. या घटनेची चौकशी शिक्षण विभागाने हाती घेतली असतानाच नवे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी संबंधित दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

मंजुळा संभाजी वाघमोडे आणि सुनीता किसन धोंडभरे अशी निलंबित झालेल्या दोघा महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त राजकुमार यांनी संबंधित चारही पीडित विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना चॉकलेट भेट देत आधार दिला.

सात रस्त्याजवळील रेल्वे लाईनमध्ये हिंदुस्थानी कॉन्व्हेंट चर्च इंग्रजी शाळेत एकाच कुटुंबातील वैष्णवी सुरेश कोळी, धानेश्वरी सुरेश कोळी (दोघी इयत्ता नववी), आराध्या रमेश कोळी (पाचवी) आदी चार मुला-मुली शिक्षण घेतात. शाळेत द्वितीय सत्र परीक्षा होती. परंतु शुल्क भरूनही शाळा व्यवस्थापनाने संबंधित चारही मुला-मुलींना परीक्षेचा पेपर लिहू दिला नाही. त्याबद्दल जाब विचारला असता शाळा व्यवस्थापनाने वाईट वागणूक दिल्याचा आरोप पालक रमेश कोळी यांनी केला आहे. कोळी यांनी य अन्यायाच्या विरोधात शाळा प्रवेशद्वारासमोर पाल्यांसह ठिय्या मारून धरणे धरले असता शाळेने आपल्यावरील आरोप नाकारत, पोलिसांना पाचारण केले.

दरम्यान, दोघा महिला पोलिसांनी पुढील चौकशीसाठी पालकासह चारही लहान पाल्यांना सरकारी वाहनात बसवून सदर बझार पोलीस ठाण्यात नेऊन सुमारे तासभर बसविले. या घटनेमुळे मुले गांगरून गेली.

दरम्यान, शाळेच्या विरोधात पालक रमेश कोळी यांनी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली असता दुसरीकडे या प्रकरण पोलिसांच्याही अंगलट आले. चारही अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात आणण्याची गरज नव्हती. त्याऐवजी त्यांना त्यांच्या घरात नेऊन सोडणे अपेक्षित होते. पोलीस आयुक्त राजकुमार यांनी या घटनेची दखल घेऊन सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्याकडे चौकशी सोपविली. चौकशीत संबंधित दोन महिला पोलीस कर्मचारी दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.