Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

26 दिवस काय केलं? एका दिवसात माहिती द्या सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला दणका

26 दिवस काय केलं? एका दिवसात माहिती द्या
सर्वोच्च न्यायालयाचा SBI ला दणका



नवी दिल्ली : खरा पंचनामा

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांची माहिती सार्वजनिक करण्याच्या मुद्द्यावरून एसबीआयला फटकारले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला निवडणूक रोख्यांची माहिती देण्यास सांगितलं होतं. मात्र एसबीआयने निवडणूक रोख्यांची माहिती लगेच देणं शक्य नसल्याचं सांगत ३० जूनपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी एसबीआयला कठोर शब्दात सुनावले.

स्टेट बँक ऑफ इंडियाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकेत ३० जूनपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एका दिवसाची मुदत देत उद्याच्या कामकाजाचे तास संपण्याआधी निवडणूक आयोगाला माहिती द्या असे आदेश दिले आहेत. तसंच १५ मार्चपर्यंत निवडणूक आयोगाने ही माहिती जाहीर करावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एसबीआयला विचारलं की, आमच्या आदेशानंतर २६ दिवस तुम्ही काय केलं? याची माहिती तुम्ही तुमच्या याचिकेत द्यायला हवी होती. हे गंभीर प्रकरण आहे आणि घटनापीठाचा आदेश आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्हाला काम करावं लागेल. निवडणूक आयोगाला तुम्हाला माहिती द्यावी लागेल.
एसबीआयच्या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती पारदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा या पाच जणांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणी एसबीआयकडून वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली.

हरीश साळवे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, निवडणूक रोखे खरेदीची तारीख आणि खरेदी करणाऱ्याचं नाव एकत्र उपलब्ध नाही. ते कोडमध्ये बदलण्यात आलं आहे. कोड डिकोड करण्यासाठी वेळ लागेल. यावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेत अनेक प्रश्न विचारले. 

आम्ही एका निर्णयाद्वारे थेट माहिती देण्यास सांगितलं होत आणि याचं पालन व्हायला हवं होतं. जर कुणी निवडणूक रोखे खरेदी केले आहेत तर त्यासाठी केवायसी आवश्यक होती असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. यावर एसबीआयने आमच्याकडे सर्व माहिती आहे, ते कोणी खरेदी केले आणि कोणत्या पक्षाला दिले गेले. निवडणूक रोखे खरेदी करणं सोपं आहे पण त्याचे नंबर आणि नाव सांगण्यासाठी वेळ लागेल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं.

सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला फटकारताना आतापर्यंत काय केलं? आम्हाला याची पूर्ण माहिती हवीय. २६ दिवसात काय केलं ते सांगा. न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्हाला काम करावं लागेल आणि निवडणूक आयोगाला माहिती द्यावी लागेल असं स्पष्ट सुनावलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.