आठवड्याभरात सहायक पोलीस निरीक्षकांना मिळणार पदोन्नती
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या दोन वर्षांपासून पदोन्नतीस पात्र असलेल्या सहायक पोलीस निरीक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातून त्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या आठवड्याभरातच पोलीस निरीक्षक पदांवर पदोन्नती मिळणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक विभागात योग्य समन्वय नसल्याने पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला खीळ बसली होती. राज्य पोलीस दलाच्या १०२ आणि १०३ क्रमांकाची तुकडी सध्या पदोन्नतीच्या कक्षेत आहेत. १०२ क्रमांकाच्या तुकडीतील अर्धेअधिक अधिकारी पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. तर अर्धे अधिकारी अजूनही सहायक पोलीस निरीक्षक पदावर कर्तव्य बजावत आहेत.
दोन वर्षांपासून अनेक अधिकारी 'बॅचमेट' असलेल्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करीत होते. पदोन्नतीसाठी कोणतीही अडचण नसतानाही १०२ क्रमांकाच्या तुकडीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येत नव्हती. मात्र, गेल्या महिनाभरापूर्वीच पदोन्नतीसाठी गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयाने हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार पोलीस महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवड्याभरात सहायक निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.