Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

आटपाडी तालुक्यात घरे फोडून ऐवज लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अडीच लाख रूपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.  

जितेंद्र उर्फ जित्या दगडू काळे (वय ५०, रा. करगणी, ता. आटपाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक मिरज परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एकजण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मिरज-अंकली रस्त्यावरील एका घराजवळ येणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक वर्धन यांना खबऱ्याद्वारे मिळाली. 

पथकाने मिरज-अंकली रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी रस्त्यावरील नवीन पुलाजवळ एकजण संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाला दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या खिशात दागिने आढळून आले. त्याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचा साथीदार महेश माचिस पवार याच्या मदतीने दिघंची येथील एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील अडीच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, आटपाडीचे निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, जयवंत जाधव, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, सोमनाथ गुंडे, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.