मांजर्डे येथे एमडी ड्रग्जचा कच्चा माल सापडला
११.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
मुंबई क्राईम ब्रांचने इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील एमडी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केल्यानंतर आता सांगली एलसीबीने या ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल जप्त केला आहे. मांजर्डे (ता. तासगाव) येथील दत्तनगर-वायफळे रस्त्यावरील एका घराजवळील पत्र्याच्या शेडमधील रासायनीक द्रव पदार्थ भरलेले १२ बॅरेल असा ११.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने सांगली येथील एमडी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उद्धवस्त केला. याप्रकरणी सांगलीतील सहाजणांसह दहाजणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला सांगलीतील संशयित प्रवीण शिंदे याच्याकडील चौकशी अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. ड्रग्ज निर्मिती आणि विक्रीतून त्याने कोट्यवधीची माया जमा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने ठाण्यातील मित्राकडे लपवलेली साडेतीन कोटींची रोकड मुंबईच्या क्राईम ब्रांचचे पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या नेतृत्वाखाली केली. त्याठिकाणी १२२ किलो ५०० ग्रॅम वजनाचा एमडी, एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करून सांगलीतून पोलिसांनी प्रविण शिंदे (३४), वासुदेव जाधव (३४), प्रसाद मोहिते (२४), विकास मलमे (२५), अविनाश माळी (२८) आणि लक्ष्मण शिंदे (३५) अशा सहा जणांना अटक केली आहे.
इरळीतील कारवाई झाल्यानंतर सांगली एलसीबीने ड्रग्जच्या तपासाला गती दिली होती. मांजर्डे येथील बाळासाहेब मोहिते याच्या घराजवळ असलेल्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याची माहिती निरीक्षक शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. शिवाय ड्रग्ज प्रकरणातील मुख्य संशयित प्रवीण शिंदे आणि त्याचा साथीदार प्रसाद मोहिते यांनी काही दिवसांपूर्वी हा कच्चा माल मोहिते याच्या घराशेजारील शेडमध्ये ठेवल्याचीही माहिती मिळाली. त्यानंतर रविवारी निरीक्षक शिंदे यांनी पथकासह तेथे छापा टाकला. तेथून २८० किलोचे क्लोरोफॅमर् १५ बॅरेल तसेच ४० लिटरचे १२ कॅन असा ११.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याचा अधिक तपास असून जप्त मुद्देमाल तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, तासगावचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, अमर नरळे, इम्रान मुल्ला, उदय माळी, गणेश शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.