राज्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल
नांदेड : खरा पंचनामा
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, राज्यातील आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेड जिल्ह्यात दाखल झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यात कसूर केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेंडी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एल. जे. जाधव यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड़चे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नांदेडच्या मुखेड पोलिसांत हा गुन्हा दाखल केला गेला आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत मुखेड विधानसभा मतदारसंघात झोन क्रमांक 25 निवळीकरिता क्षेत्रीय अधिकारी म्हणून एल. जे. जाधव यांची नियुक्ती केलेली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने 2 फेब्रुवारी रोजी नियोजन भवन येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला एल. जे. जाधव यांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर क्षेत्रीय अधिकारी जाधव यांना अनेकवेळा दूरध्वनीद्वारे निवडणूक संबंधीचे कामकाज करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच निवळी येथील मतदान केंद्र तपासणी अहवालही त्यांनी सादर केला नाही. त्यामळे हा अहवाल वरिष्ठांना देता आला नाही.
दरम्यान, जाधव यांना अंतिम नोटीस देऊन सुद्धा त्यांनी अद्यापपर्यंत नोटिसीचा खुलासा केला नाही. त्यामुळे निवडणूक संबंधाने दिलेले कर्तव्य न करता निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याने या प्रकरणात नायब तहसीलदार अशोक लबडे यांच्या तक्रारीवरून उपविभागीय अभियंता एल. जे. जाधव यांच्या विरोधात मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.