काँग्रेसचा उमेदवार फोडून थेट लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली
भाजप सांगलीत मविआला पहिला धक्का देणार
सांगली : खरा पंचनामा
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शाह हे मुंबईत आल्यानंतर अनेक दिवसांपासून रखडलेल्या महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम होण्याची शक्यता आहे.
भाजपने राज्यातील 32 जागांवर दावा केला असून त्याचे उमेदवारही अंतिम केल्याची माहिती आहे. अशातच भाजप आता महाविकास आघाडीला पहिला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. सांगलीतून भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा पत्ता कट होणार असून काँग्रेसच्या विशाल पाटील यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे.
भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर त्यांच्याच पक्षातील आमदार आणि भाजप नेते देखील नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच भाजपकडून सांगलीतील उमेदवार बदलाच्या चर्चा आहेत. अशातच भाजपच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. त्यामध्ये सांगलीतील संजयकाका पाटील यांच्या ऐवजी काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने सुरू केल्याचं दिसतंय.
गेल्या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसच्या विशाल पाटलांना स्वाभिमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती. त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून विशाल पाटलांनी पुन्हा एकदा चांगली तयारी सुरू केली.
कोल्हापूरची शिवसेना ठाकरे गटाची जागा काँग्रेसने आपल्याकडे घ्यावी आणि त्या ठिकाणी शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी, त्या बदल्यात ठाकरे गटाला सांगलीतील जागा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळेही विशाल पाटील हे नाराज असल्याची चर्चा होती. याचा फायदा आता भाजप घेण्याच्या तयारीत असून त्यांनी विशाल पाटलांनाच आपल्या पक्षात घेण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.