Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत १९ कोटींची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त; कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या तिघांना अटक विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती

मिरजेत १९ कोटींची व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त; कोल्हापूर, सिंधुदुर्गच्या तिघांना अटक
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची माहिती 



सांगली ः खरा पंचनामा

मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील वांडरे कॉर्नर परिसरात व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथील संशयितांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या उलटीची किंमत १९.१७ कोटी रूपये आहे. संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि कार असा एकूण १९.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


मंगेश माधव शिरवडेकर (वय ३६, रा. जवाहरनगर, कोल्हापूर), संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (वय ३५, रा. वायरी मालवण), वैभव रामचंद्र खोबरेकर (वय २९, रा. देवबाग, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात पोलिसांनी गस्त वाढून अवैध तस्करीवर कारवाई करण्याचे आदेश महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी परिक्षेत्रातील सर्व पोलिस ठाणी, अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार मिरज शहरचे पोलिस निरीक्षक अरूण सुगावकर यांचे एक पथक मिरजेत गस्त घालत होते. 

रविवारी मध्यरात्री मिरज-म्हैसाळ रस्त्यावरील वांडरे कॉर्नर येथे दोघेजण संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाने दिसून आले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ व्हेल माशाच्या उलटीच्या (अंबरग्रीस) चार लाद्या सापडल्या. त्या जप्त करून तिघांनाही अटक करण्यात आली. त्याशिवाय त्यांच्याकडील मोपेड (एमएच १० डीपी ९७०८), कार (एमएच ०७ एएस ०११७) असा एकूण १९.२४ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी सांगितले. 

यावेळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, मिरज शहरचे निरीक्षक अरूण सुगावकर उपस्थित होते. 

मिरज शहरचे पोलिस निरीक्षक अरूण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विक्रम पाटील, उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, वैभव पाटील, निलेश कदम, संदीप मोरे, अमिरशा फकीर, लक्ष्मण कौजलगी, दीपक परीट, धनंजय चव्हाण, फारूख नालबंद, उदय लवटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.