मान गादीला आणि मतदेखील गादीलाच मिळणार!
कोल्हापूर : खरा पंचनामा
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आता काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराजांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आणि कार्य नाकारून चालणार नाही. मात्र, समाजकारण आणि राजकारणाला जी दिशा मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. त्यांनी योग्य दिशा दिली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. समाज आणि राजकारणाची दिशा सुधारण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत नसल्यामुळेच सगळे पक्ष त्यांच्या विरोधात आले आहेत."
या वेळी शाहू महाराज म्हणाले, जनतेच्या प्रचंड आग्रहामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. कोल्हापूरच्या विकासाला नवीन चेहरा आणि गती देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. विकास तर सगळेच करत असतात, मात्र त्याला योग्य दिशा देण्याचे काम माझे असेल. वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या पंगतीत कोल्हापूर उठावदार दिसेल, येथील तरुणांच्या गुणवत्तेला वाव मिळेल, सुशिक्षितांच्या हाताला रोजगार मिळेल. शेतकऱ्यांच्य प्रश्नांची सोडवणूक होईल. तसेच आघाडीच्या नेतेमंडळींचा पाठिंबा आणि संबंध जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आपण जिंकू, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
ते म्हणाले, "जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा समतेचा विचार पुढे नेण्याची गरज आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा प्रभाव माझ्यावर आहे. यापूर्वी राजकारणात प्रत्यक्षात नव्हतो, पण आता समाजकारणाला राजकारणाची जोड देणार. तसंच सर्वांना वाटलं असावं, की महाराजांची गरज असावी म्हणून मला उमेदवारी देण्यात आली."
कोल्हापूर-कोकण रेल्वे, विमानतळ याबरोबरच अनेक प्रश्नांवर कामं करणार असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं. शिवाय कोल्हापूरकरांनी संधी दिली तर महाराष्ट्राला नेतृत्व देण्याचा माझा प्रयत्न असेल. आज महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर गेल्या 60 वर्षांत जी परिस्थिती नव्हती तशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच कारणाने पक्षांतर बंदी कायदा फेल झाला आहे. कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव मिळायला हवं. ते का मागे पडत आहे समजत नाही? असा प्रश्न उपस्थित करतच, मान गादीला आणि मतदेखील गादीलाच मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश एकाधिकारशाहीकडे वळत आहे, लोकशाही टिकली पाहिजे, म्हणूनच मी लोकसभेच्या मैदानात उतरलो असल्याचंही ते या वेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.